
लातूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।
गेल्या दोन दिवसांपासून शिरूर अनंतपाळ तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी पावसाअभावी खरीप पिके करपण्याच्या मार्गावर होती मात्र या पावसामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस व इतर खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाणी साठ्यात वाढ होण्याची शक्यता
तालुक्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतांमध्ये ओलावा निर्माण झाला असून पिकांची वाढ जोमाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओढे, नाले व लहान जलस्रोत पुन्हा प्रवाहित झाले असून विहिरी व शेततळ्यांच्या पाणीपातळीतही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या
चिंतेचे वातावरण या पावसामुळे काही प्रमाणात दूर झाले आहे. खरीप हंगामासाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तथापि, पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहिल्यास पिकांची वाढ अधिक चांगली होईल, तसेच भूजल पातळी आणि धरणांतील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis