अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन
खरीप २०२६ राज्यांतर्गत पिकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू धाराशिव, 01 ऑगस्ट (हिं.स.)। राज्यातील विविध भागांतील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून घेतलेल्या विक्रमी उत्पादनाला प्रोत्साहन देणे,त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि इतर
अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन


खरीप २०२६ राज्यांतर्गत पिकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

धाराशिव, 01 ऑगस्ट (हिं.स.)।

राज्यातील विविध भागांतील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून घेतलेल्या विक्रमी उत्पादनाला प्रोत्साहन देणे,त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि इतर शेतकऱ्यांनाही त्यातून प्रेरणा मिळावी,या उद्देशाने राज्य शासनामार्फत दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविली जाते. यंदाच्या खरीप हंगाम २०२६ पासून या स्पर्धेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून,शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरून अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.

यापूर्वी पिकस्पर्धेची संपूर्ण प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविली जात होती.मात्र,प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या उद्देशाने यंदापासून स्वतंत्र ऑनलाइन संगणक प्रणाली (ऑनलाइन पोर्टल) विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार कृषी विभागाने सन २०२६-२७ साठी अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांच्या राज्यस्तरीय खरीप पिकस्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेत सर्वसाधारण आणि आदिवासी गटातील शेतकरी सहभागी होऊ शकतात.

तालुकास्तरावरील स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या आधारे राज्य,जिल्हा आणि तालुकास्तरावरील विजेत्यांची निवड केली जाणार आहे.खरीप हंगामातील भात, ज्वारी,बाजरी,मका,नाचणी (रागी), तूर,मूग,उडीद,सोयाबीन,भुईमूग आणि सूर्यफूल या एकूण ११ पिकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे आणि ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. सहभागी लाभार्थ्याच्या शेतामध्ये भात पिकासाठी किमान २० गुंठे, तर इतर सर्व पिकांसाठी किमान ४० गुंठे सलग लागवड क्षेत्र असणे आवश्यक आहे.स्पर्धेसाठी अर्ज करताना फार्मर आयडी,प्रवेश शुल्क भरल्याचे चलन,आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र तसेच बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याच्या अंतिम तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. मूग आणि उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै २०२६ होती.ती आता १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर भात,ज्वारी,बाजरी,मका,नाचणी (रागी), तूर,सोयाबीन,भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ आहे.स्पर्धेचे प्रवेश शुल्क पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये,तर आदिवासी गटासाठी १५० रुपये निश्चित करण्यात आले आहे.

बक्षिसांची रक्कम तालुका,जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर देण्यात येणार आहे.

तालुकास्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये बक्षीस देण्यात येईल. जिल्हास्तरावर अनुक्रमे १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये,तर राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपये,द्वितीय क्रमांकासाठी ४० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३० हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील पीक स्पर्धा नोंदणी या टॅबद्वारे ऑनलाइन अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.तसेच स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande