
रत्नागिरी, 1 ऑगस्ट (हिं.स.) । सुमारे साडेसात महिन्यांच्या विश्रांतीनंतर ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेली राजापूरची गंगामाई पुन्हा प्रवाहित झाली आहे.
गुरुपौर्णिमेनंतर मूळ गोमुखातून सुरू झालेला पाण्याचा प्रवाह आता वाढू लागला असून, परिसरातील इतर कुंडांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे राजापूर गंगा परिसरात पुन्हा एकदा भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा ८ जुलै रोजी गंगामाईचे आगमन झाल्याची नोंद झाली होती. त्यानंतर मूळ गोमुखातून अल्प प्रमाणात सुरू झालेला पाण्याचा प्रवाह गेल्या काही दिवसांत वाढला आहे. मुसळधार पावसामुळे या प्रवाहात आणखी भर पडली असून, गोमुखातून सातत्याने वाहणारे पाणी आणि पाण्याने भरलेली कुंडे पाहण्यासाठी नागरिक, भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने राजापूर गंगा परिसराला भेट देत आहेत.
कोकणातील एक अद्वितीय नैसर्गिक आणि आध्यात्मिक ठिकाण म्हणून राजापूर गंगेची ओळख आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. पूर्वी गंगामाईचे आगमन ठरावीक कालावधीनंतर होत असे. साधारणपणे डिसेंबर किंवा जून महिन्यात गंगामाई प्रकट होऊन दोन ते आठ आठवडे प्रवाहित राहत असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पुन्हा सुमारे तीन वर्षांनी तिचे आगमन होत असल्याची परंपरा होती. मात्र, गेल्या दोन दशकांत या चक्रात लक्षणीय बदल झाल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी गंगामाईच्या आगमनावेळी देशभरातून हजारो भाविक राजापूरमध्ये दाखल होत असत. त्यामुळे स्थानिक व्यापार आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळत असे. मात्र, अलीकडच्या काळात गंगामाईचे आगमन वारंवार होत असल्याने त्याबाबतचे आकर्षण काहीसे कमी झाल्याचे स्थानिकांचे मत आहे.
या नैसर्गिक घटनेमागील भूगर्भशास्त्रीय, जलशास्त्रीय आणि पर्यावरणीय कारणांचा सखोल अभ्यास करण्याची गरजही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गंगामाई पुन्हा प्रवाहित झाल्याने राजापूरकरांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आगामी काही दिवसांत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी