
धाराशिव, 01 ऑगस्ट (हिं.स.)।
जिद्द, ज्ञान आणि अथक परिश्रम यांच्या बळावर आपल्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील सुपुत्र डॉ. बालाजी आगलावे यांनी अमेरिकेत आधुनिक शेती आणि कृषी संशोधनाच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवत महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे..
दहिफळ येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, येरमाळा येथे माध्यमिक शिक्षण, त्यानंतर परभणी येथून बी.एस्सी. आणि एम.एस्सी. (कृषी) तसेच नागपूर येथील एनआरसीसीमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. आगलावे यांनी ज्ञानाला कृतीची जोड देत अमेरिकेतील कृषी क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे..
सन २००९ मध्ये अमेरिकेतील AG Metrics या कंपनीत सायंटिस्ट म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या संशोधन क्षमतेने, दूरदृष्टीने आणि नेतृत्वगुणांनी त्यांनी २०१२ मध्ये प्रिन्सिपल सायंटिस्ट, २०१५ मध्ये डायरेक्टर आणि अवघ्या एका वर्षात म्हणजे २०१६ मध्ये कंपनीचे प्रमुखपद मिळवले. त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा, संशोधनाची दृष्टी आणि व्यवस्थापन कौशल्य पाहून मूळ मालकांनी कंपनीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली..
आज तब्बल १७० वैज्ञानिक कार्यरत असलेली आणि सुमारे ४०० कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीची कंपनी त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे कार्यरत आहे. अवघ्या २० एकरांपासून सुरू झालेल्या या प्रवासाने आज १८०९ एकर अत्याधुनिक शेती आणि आधुनिक कृषी संशोधनाचे जागतिक केंद्र अशी उंची गाठली आहे..
डॉ. आगलावे यांच्या कंपनीकडे १६ आंतरराष्ट्रीय पेटंट असून त्यांनी १०० हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या दोन पुस्तकांना परदेशातही मोठी मागणी असून ती विविध भाषांमध्ये उपलब्ध आहेत. कंपनी विकसित करत असलेली जैविक खते आणि कृषी उत्पादने वॉलमार्ट व अॅमेझॉनसारख्या जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत..
त्यांच्या कंपनीत विकसित होणारी कीटकनाशके आणि खतांची गुणवत्ता लॅब, ग्रीनहाऊस आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात तपासली जातात. त्यामुळे संशोधन आणि प्रत्यक्ष शेती यांचा प्रभावी मेळ घालण्याचे काम ही कंपनी करत आहे..
डॉ. आगलावे यांच्या अत्याधुनिक शेतीमध्ये आंबा, संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्षे, ऊस, शेवगा, फणस, सीताफळ, कडीपत्ता, टोमॅटो, कलिंगड आणि विविध पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे, अमेरिकेत पूर्वी प्रामुख्याने मेक्सिकोमधून आंब्यांची आयात होत असताना त्यांनी केशर आणि हापूस आंब्यांचे उत्पादन सुरू करून भारतीय आंब्यांना नवी ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या शेतातील एक आंबा ५०० ते ७०० रुपयांना विकला जात असून त्यामुळे मेक्सिकोच्या बाजारपेठेलाही मोठे आव्हान निर्माण झाले आहे..
त्यांच्या कंपनीने कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तयार केलेला फळांचा ज्यूस अमेरिकन बाजारात ग्रीन झोन या ब्रँडने उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानामुळे फळांतील पोषक घटक अबाधित राहतात आणि आरोग्यदायी उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचते..
याचबरोबर कडीपत्त्याच्या अर्कापासून तयार केलेल्या जैविक कीटकनाशकाला अमेरिकन सरकारची मान्यता मिळाली असून ते प्रभावी बुरशीनाशक म्हणूनही सिद्ध झाले आहे. पर्यावरणपूरक शेतीसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे..
यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही डॉ. बालाजी आगलावे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. भारतातून शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ते दोन वर्षे मोफत निवास, पार्ट-टाईम रोजगाराच्या संधी आणि आवश्यक ते मार्गदर्शन देऊन त्यांच्या स्वप्नांना बळ देत आहेत..
त्यांच्या या जागतिक दर्जाच्या संशोधन केंद्राला आणि अत्याधुनिक शेतीला आमदार अभिजित पाटील यांच्यासमवेत भेट देऊन पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाची व्यापकता आणि शेतीकडे पाहण्याचा त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन पाहून अभिमानाने ऊर भरून आला..
येरमाळ्यासारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेल्या एका युवकाने संशोधन, उद्योग आणि आधुनिक शेतीच्या बळावर अमेरिकेत जागतिक स्तरावरील यश संपादन करणे हे वैयक्तिक उपलब्धी नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. डॉ. बालाजी आगलावे यांची यशोगाथा आजच्या तरुणांसाठी मोठी प्रेरणा ठरत असून, ज्ञान, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर जग जिंकता येते, याचा जिवंत आदर्श त्यांनी घालून दिला आहे..
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis