सोलापुरात एचएसआरपी नसलेल्या ७७० वाहनांवर कारवाई
सोलापूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी
HSRP


सोलापूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी ३० जून २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती.

मुदत संपल्यानंतर परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने १ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत एचएसआरपी नसलेल्या तसेच नियमबाह्य नंबर प्लेट वापरणाऱ्या ७७० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७ लाख ७९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी ८० हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले की, ज्या वाहनधारकांनी अद्याप एचएसआरपी बसविलेली नाही, त्यांना परिवहन विभागाच्या विविध ऑनलाइन सेवांचा लाभ मिळणार नाही. वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, वाहनावरील कर्जाची नोंद, पुनर्नोंदणी आणि परवान्याचे नूतनीकरण यांसारख्या सेवांवर निर्बंध लागू राहतील. त्यामुळे वाहनधारकांनी अधिकृत विक्रेत्याकडून तातडीने एचएसआरपी बसवून घ्यावी. अन्यथा पुढील काळात अधिक कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande