
अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.)। पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांत २४ तासांत सरासरी १०८ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचे रेड अलर्टमध्ये पाचही जिल्ह्यांतील तब्बल ४५ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये नदी-नाल्यांना आलेल्या पुरात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात पाच जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे तर भिंत अंगावर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात झालेला आहे. याशिवाय १२० वर लहान-मोठ्या गुरांचा मृत्यू पुरामुळे ओढवला आहे.
'आयएमडी'द्वारा विभागात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सरासरी ७६ मिमी, यवतमाळ १३५.२ मिमी, अकोला ७४.६ मिमी, वाशिम ११०.९ तर बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक १२४.६ मिमी पावसाची नोंद झाली. एका दिवसाच्या पावसाने विभागातील २६ टक्के पावसाची तूट भरून निघाली आहे. अर्धा पावसाळा संपत असताना झालेल्या दमदार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला व खोलगट भागातील अनेक घरांमुळे पाणी शिरले तर पुरामुळे वाहतुकीचे मार्ग काही काळ बंद झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी