रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
रत्नागिरी, 1 ऑगस्ट (हिं.स.) । गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६वर आंबा घाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आंब
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी


रत्नागिरी, 1 ऑगस्ट (हिं.स.) । गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६वर आंबा घाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आंबा घाटातून होणारी सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक पुढच्या आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.

या महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. आंबा घाट तीव्र उतार, खोल दऱ्या आणि अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याच्या दृष्टीने संवेदनशील भाग आहे. सततच्या पावसामुळे एका ठिकाणी रस्त्याच्या डाव्या बाजूला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी १०० मीटर खोल दरी असल्याने रस्ता खचून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अहवालात वर्तवण्यात आली होती. त्यामुळे तातडीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्ण बंदी घालण्यात आली असून, केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि हलकी प्रवासी वाहने नियंत्रित वेगाने आणि खबरदारी घेऊन या मार्गावरून प्रवास करू शकतील. अवजड वाहनांसाठी अणुस्कुरा घाट, भुईबावडा किंवा फोंडा घाट हे पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande