
बीड, 01 ऑगस्ट (हिं.स.)।
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध घडामोडी घडत असून, एका जाहीर कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना उघड केल्या आहेत. बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एका विशेष सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकीय प्रवास आणि मैत्रीबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले.
याप्रसंगी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, नाईक कुटुंबावर नेहमीच जगदंबा मातेची कृपा राहिली आहे. वसंतराव नाईक यांच्यापासून ते सुधाकरराव नाईक यांच्यापर्यंतच्या नेत्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी लाभली. त्यानंतर मनोहर नाईक आणि आता स्वर्गीय अजित पवार यांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईक यांना मंत्री पद देऊन या घराण्याचा मान राखला आहे, असे सांगत त्यांनी या कुटुंबाच्या नशिबाचे कौतुक केले.
पुढे बोलताना त्यांनी आपल्या मनातील खंत देखील बोलून दाखवली. धनंजय मुंडे म्हणाले की, आम्ही दोघेजण एकत्र मंत्री झालो असतो तर बरे झाले असते, परंतु तसे घडले नाही आणि एकाला घरी बसावे लागले. असे असले तरी राजकीय पद आणि प्रतिष्ठा येतील व जातील, मात्र बंजारा समाज आणि जनतेने दाखवलेली निष्ठा ही अत्यंत महत्त्वाची आहे. या निष्ठेची कोणतीही तुलना होऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी उपस्थितांशी असलेले आपले भावनिक नाते अधोरेखित केले.
या सोहळ्यात बोलताना त्यांनी वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीची व कार्याची आठवण करून दिली. दुष्काळकाळात राज्यातील एकाही नागरिकाला अन्नाशिवाय राहू देणार नाही, असा ठाम संकल्प करून त्यांनी अन्नधान्य संपन्नता आणली होती. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लाखो हातांना काम मिळवून दिले. शेतकरी हिताला प्राधान्य देत प्रशासनावर मजबूत पकड ठेवणारे वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते होते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाच्या शेवटी समाजातील प्रत्येक घटकाचे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बंजारा संस्कृतीचे जतन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis