
छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। पडेगाव येथील सफारी पार्कमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विकासकामांची पाहणी त्यांनी केली. पर्यावरण संवर्धन आणि भावी पिढीसाठी हरित वारसा जपण्याच्या उद्देशाने पडेगाव येथील सफारी पार्क परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक वृक्ष हा निसर्गाचा अमूल्य ठेवा असून, त्याचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
यानंतर सफारी पार्कमधील विविध विकासकामांची तसेच उपलब्ध सुविधांची सविस्तर पाहणी केली. पर्यटकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि सफारी पार्क अधिक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी विविध बाबींवर चर्चा करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांसोबत विकासकामांचा आढावा घेत परिसर अधिक समृद्ध, सुशोभित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. हरित, सुंदर आणि विकसित छत्रपती संभाजीनगर घडविण्याच्या दिशेने प्रत्येक पाऊल दृढ संकल्पाने पुढे टाकत आहोत. याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis