शेकापच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त खालापूरमध्ये भव्य मेळावा
मेळाव्याला तब्बल २५ हजार कार्यकर्ते लावणार हजेरी रायगड, १ ऑगस्ट (हिं.स.) : शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (दि. २) रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी पक्षाने ज
Khalapur-decked-out-in-red-fla


मेळाव्याला तब्बल २५ हजार कार्यकर्ते लावणार हजेरी

रायगड, १ ऑगस्ट (हिं.स.) : शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (दि. २) रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी पक्षाने जय्यत तयारी पूर्ण केली असून, राज्यभरातून सुमारे २५ हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा दावा शेकापकडून करण्यात आला आहे.

मुंबई-पुणे महामार्गालगत सकाळी ११ वाजता होणाऱ्या या मेळाव्याचे अध्यक्षस्थान शेकापचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील भूषविणार आहेत. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, आमदार सत्यजीत तांबे आणि आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

याशिवाय शेकापचे वरिष्ठ नेते, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला, युवक तसेच पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शेकापने गेल्या महिनाभरापासून रायगड जिल्ह्यात जनसंपर्क मोहीम राबविली. तालुकानिहाय बैठका, गावभेटी आणि कार्यकर्ता संवादाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. खालापूर परिसरात लाल झेंडे, स्वागत कमानी आणि फलक लावून सजावट करण्यात आली असून, मंडप उभारणी, आसनव्यवस्था, पार्किंग, वाहतूक नियोजन, पिण्याचे पाणी आणि इतर सुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा पक्षाच्या संघटनशक्तीचे दर्शन घडविणारा ठरेल, असा विश्वास शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला. तसेच राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वर्धापन दिन सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande