जीवन अनमोल आहे विशेष पाल्यांसोबत आनंददायी व आरोग्यसंपन्न जीवन जगावे - जिल्हाधिकारी प्रसाद
Life is precious, live a happy and healthy life with special children - Prasad
Life is precious, live a happy


नाशिक, 01 ऑगस्ट (हिं.स.)।राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत मोफत शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया झालेल्या बालकांचा तसेच त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा आज नियोजन भवन येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लाभार्थी बालके व त्यांच्या पालकांशी संवाद साधत, बालकांचे आरोग्य ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. बालवयात होणाऱ्या आजारांचे वेळेत निदान व उपचार करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अत्यंत प्रभावी ठरत असून या योजनेअंतर्गत दुर्मिळ व गंभीर आजारांवरील मोफत उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांनी या सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. बालकांचे निरोगी व उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय व अधीनस्थ रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी अंगणवाडी व शाळांमध्ये बालकांची आरोग्य तपासणी करतात. तपासणीत आजार आढळलेल्या बालकांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय तसेच आवश्यकतेनुसार विशेष सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात येते.

या कार्यक्रमात आरबीएसके अंतर्गत मोफत हृदय शस्त्रक्रिया तसेच कॉख्लिअर इम्प्लांट श्रवण शस्त्रक्रिया झालेल्या ६० बालकांचा व त्यांच्या पालकांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरबीएसके वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा व मानांकनाधारित कामकाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी नेतृत्वाबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचाही गौरव करण्यात आला.

लाभार्थी पालकांनी मनोगत व्यक्त करताना मोफत उपचार व शस्त्रक्रियेमुळे आपल्या मुलांना नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त केली.

कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार शिंपी, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. संदीप सूर्यवंशी, आरबीएसके कार्यक्रम समन्वयक दीपक चौधरी, विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande