
कोल्हापूर, 01 ऑगस्ट (हिं.स.) |महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असून, अधिकारी-कर्मचारी, औद्योगिक संघटना आणि उद्योजकांच्या योगदानामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला मोठी चालना मिळाली आहे. औद्योगिक विकासाची ही वाटचाल पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
एमआयडीसीचा ६४ वा वर्धापन दिन हॉटेल पॅव्हेलियन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड बोलत होते.
कार्यक्रमास एमआयडीसीचे कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक व प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, “ महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. या औद्योगिक प्रगतीमध्ये एमआयडीसीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एमआयडीसीचे अधिकारी-कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि औद्योगिक संघटना यांनी या औद्योगिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे.”
औद्योगिक विकासाच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि औद्योगिक संघटनांकडून वेळोवेळी मांडण्यात येणाऱ्या सूचनांचा सकारात्मक विचार करूनच पुढील वाटचाल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी संघटनांनी मांडलेल्या सकारात्मक सूचना आणि उद्योजकांच्या अडचणी यांचा विचार करून प्रशासन पुढील दिशा ठरवत आहे,” असे त्यांनी नमूद केले.
उद्योगांसाठी परवानगी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एमआयडीसीने केलेल्या डिजिटल सुधारणांचे त्यांनी कौतुक केले. “ सिंगल विंडो प्रणालीद्वारे अर्ज केल्यानंतर अनेक सेवांसाठी सिस्टीम जनरेटेड ऑटो अप्रूव्हलची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे उद्योजकांना प्रत्येक कामासाठी एमआयडीसी कार्यालयात येण्याची गरज कमी झाली आहे. मानवी हस्तक्षेप कमीत कमी करून जास्तीत जास्त सुविधा देण्यावर आमचा भर आहे ” असे त्यांनी सांगितले.
डॉ. राठोड म्हणाले, “कोल्हापुरातील आयटी पार्क आणि त्यानंतर शाहूवाडी येथील एमआयडीसीसाठी प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसीचा चांगला लेआउट तयार करून जास्तीत जास्त उद्योगांना येथे गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी परिषद आयोजित केली जाईल. या माध्यमातून स्थानिक नागरिक, हुशार गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.”
एमआयडीसीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
एमआयडीसीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, लॅपटॉप, वाहन भत्ता आदी सुविधांमध्ये वाढ करण्यासह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबत उद्योगमंत्र्यांनी विविध सकारात्मक निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख म्हणाले, “एमआयडीसी ही नफा कमावणारी संस्था नाही. राज्यातील तळागाळातील जिल्हा आणि तालुक्यांपर्यंत औद्योगिकीकरण पोहोचावे आणि त्यातून महाराष्ट्रासह देशाचा विकास व्हावा, हा एमआयडीसीचा मुख्य उद्देश आहे.” कोल्हापुरातील आयटी पार्कसाठीची जागा एमआयडीसीच्या ताब्यात आली असून, लवकरच टू जी नोटिफिकेशन काढून आयटी पार्क विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक यांनी एमआयडीसीच्या वाटचालीचा आढावा घेताना सांगितले, “१९६२ मध्ये एका औद्योगिक क्षेत्रापासून सुरू झालेल्या महामंडळाने आजपर्यंत ३०६ औद्योगिक क्षेत्रे स्थापन करून ती कार्यरत केली आहेत. ही संख्या दरवर्षी वाढत आहे.” एमआयडीसी चे जलपुरवठा नेटवर्क मोठ्या प्रमाणात विस्तारले असून, महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत तत्कालीन अधिकारी, अभियंते, नियोजक आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे एमआयडीसीचा शिस्तबद्ध विकास झाला आहे.
“उद्योजक आणि उद्योग असतील तरच एमआयडीसी आहे. उद्योजक आमचा ग्राहक आहे, तो आमचा देव आहे, ही भावना मनात ठेवून आपण काम केले पाहिजे. उद्योजकांच्या गरजा समजून घेऊन काम केल्यामुळेच एमआयडीसीची प्रगती झाली,” असे नाईक यांनी स्पष्ट केले.
एमआयडीसीने केवळ औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती न करता आयटी पार्क, डेडिकेटेड टेक्स्टाईल पार्क, जेम्स अँड ज्वेलरी पार्क, सिल्व्हर पार्क आणि लेदर पार्क यांसारखी विशेष औद्योगिक क्षेत्रे विकसित केली आहेत.
देशात उत्पादन वाढवून आयात कमी आणि निर्यात वाढविण्याच्या ‘मेक इन इंडिया’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्र आणि पर्यायाने एमआयडीसीने आघाडीवर राहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून एमआयडीसीला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोल्हापुर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले, गोशिमाचे अध्यक्ष सुनील शेळके, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, मॅकचे संचालक हरिश्चंद्र धोत्रे, आयआयएफ कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष सतीश कडुकर, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, कोल्हापूर फर्स्टचे अध्यक्ष सुरेन्द्र जैन आणि आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले.
एमआयडीसीत २५ वर्षे सेवा बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गौरव करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
एमआयडीसीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानास वेळोवेळी मार्गदर्शन करणारे पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड तसेच औद्योगिक क्षेत्रातील विविध उपक्रमांची सकारात्मक दखल घेऊन वृत्तांकन करणाऱ्या पत्रकार बांधवांचा ही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशनअंतर्गत ‘सुखाचा पासवर्ड’ या विषयावर व्याख्याते सागर चव्हाण यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले. दैनंदिन जीवनातील ताणतणावावर मात करून सकारात्मक विचार, आनंदी जीवनशैली आणि सुदृढ परस्पर संबंध याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास कोल्हापूर फाउंड्री क्लस्टरचे अध्यक्ष दीपक चोरगे, स्मॅकचे उपाध्यक्ष भरत जाधव, ऑ. सेक्रेटरी रणजीत जाधव, कोल्हापूर इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, गोशिमाचे उपाध्यक्ष संजय देशिंगे, आयटी असोसिएशनचे पदाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार उपअभियंता अजयकुमार रानगे यांनी मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar