अमरावती - नगरपरिषदेत अधिकाऱ्यांअभावी नागरिकांची अनेक कामे रखडली
अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.) | नगरपरिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमतरता निर्माण झाल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून मोर्शीतील नागरिकांना विविध कामांसाठी हेलपाटे घ्यावे लागत आहेत. मुख्याधिकारी रजेवर असल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकार
अमरावती - नगरपरिषदेत अधिकाऱ्यांअभावी नागरिकांची अनेक कामे रखडली


अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.) | नगरपरिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमतरता निर्माण झाल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून मोर्शीतील नागरिकांना विविध कामांसाठी हेलपाटे घ्यावे लागत आहेत. मुख्याधिकारी रजेवर असल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला होता. त्यामुळे नगर परिषदेतील अनेक महत्त्वाची कामे रखडल्याची चर्चा आहे.

याच काळात शहराच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. नगर परिषदेने महावितरणकडे तातडीने पाठपुरावा करून अखेर वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला. सुमारे २८ तासांनंतर पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुख्याधिकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे अधिकारी प्रत्यक्ष नगर परिषद कार्यालयात हजर नसल्याने विविध प्रशासकीय निर्णय प्रलंबित राहिल्याचे सांगितले जात आहे.

दाखले, परवानग्या, प्रशासकीय मंजुरी आणि इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. नगर परिषदेसारख्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत कायमस्वरूपी सक्षम प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. अतिरिक्त कार्यभारामुळे प्रशासनावर ताण वाढत असून याचा थेट परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या सेवांवर होत असल्याचे चित्र आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande