
यवतमाळ, 01 ऑगस्ट (हिं.स.) | तालुक्यातील मार्डी ते खैरी-वडकी दरम्यान सुरू असलेल्या ३३-११ केव्ही वीज जोडणीच्या कामात प्रचंड निष्काळजीपणा आणि निकृष्ट दर्जा समोर आला आहे. पहिल्याच पावसात जमीनदोस्त झालेले विजेचे खांब कंत्राटदार कंपनीने पुन्हा उभे केले खरे, मात्र नुकत्याच झालेल्या किरकोळ पावसात हे खांब पुन्हा एकदा कोसळल्याने या संपूर्ण कामाच्या कार्यप्रणालीवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधीचेच जुने खांब उभे करण्याचे आव्हान असताना, नव्याने उभे केलेले खांबही पुन्हा पडल्याने वीज वितरण कंपनी आणि कंत्राटदार कंपनीच्या कारभारावर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
वडकी ते मार्डी दरम्यानच्या वीज जोडणीचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने रस्त्याच्या बाजूला विजेचे खांब उभे केले. परंतु, कामाचा दर्जा इतका सुमार होता की, पावसाळ्याच्या सुरवातीलाच झालेल्या पहिल्याच साध्या पावसात या मार्गावरील तब्बल २४ ते २५ विजेचे खांब जमीनदोस्त झाले होते. कोणतेही मोठे वादळ-वारा नसताना अवघ्या ४ ते ५ महिन्यांपूर्वी उभे केलेले खांब पडल्याने या कामाच्या दर्जाची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार कंपनीने अनेक खांब हे रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीच्या अगदी कडेला उभे केले आहेत. खांब उभे करताना योग्य खोलीचा खड्डा करणे आणि त्यात पुरेसे काँक्रिटीकरण करणे बंधनकारक असते.
मात्र, या नियमांना पूर्णपणे हरताळ फासण्यात आला. परिणामी, सध्या या मार्गावर दहा ते १५ खांब अजूनही धोकादायक पद्धतीने वाकलेल्या अवस्थेत उभे असून ते कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर प्रकाराबाबत ग्रामीण भागाचे कनिष्ठ अभियंता नीलेश काकडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी केवळ ‘पंचनामा सुरू आहे’ एवढेच त्रोटक उत्तर देऊन फोन कट केला. तर दुसरीकडे, उपकार्यकारी अभियंता संतोष लोहे यांनी या विषयावर काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून या कामाची तत्काळ चौकशी करून कंत्राटदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मारेगाव परिसरातील नागरिक करत आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी