
पुणे, 01 ऑगस्ट (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड, राजगुरुनगर आणि लोणावळा या भागांसाठी स्वतंत्र वीज परिमंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच मतदारसंघनिहाय वीज वितरण सनियंत्रण समित्या स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
बैठकीत पुढील सहा महिन्यांत पाषाण–सांगवी वीजवाहिनीचे काम सुरू करणे, यशदा परिसरात नवीन वीज उपकेंद्र उभारणे, तसेच शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नवीन उपकेंद्रे आणि सबस्टेशनसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गहुंजे येथे प्रस्तावित २२०/२२ केव्ही क्षमतेच्या अतिउच्चदाब उपकेंद्राच्या प्रस्तावाला गती देण्याबाबतही चर्चा झाली. पूरप्रवण भागातील वीजयंत्रणा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, भूमिगत वीजवाहिन्यांचे संरक्षण, तसेच जुन्या वीजयंत्रणेची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. महावितरणच्या 'प्रकाश भवन' कार्यालयात झालेल्या या बैठकीला महापारेषण आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु