लातूर - शिरूर अनंतपाळ येथे वैयक्तिक कर्ज मेळावा
लातूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटातील महिलांना स्वावलंबी व उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक कर्ज मेळाव्याचे आयोजन पंचायत समिती सभागृह, श
वैयक्तिक कर्ज मेळावा


लातूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटातील महिलांना स्वावलंबी व उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक कर्ज मेळाव्याचे आयोजन पंचायत समिती सभागृह, शिरूर अनंतपाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय इंगळे आणि गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा उद्योग केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती शिरूर अनंतपाळचे सभापती संजय सूर्यवंशी हे होते.

मान्यवरांनी शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असून, महिलांनी स्वतःचा उद्योग उभारून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालावी आणि इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरावे, असा विश्वास व्यक्त केला. या मेळाव्यास मिटकॉनचे शेख, तालुका अभियान व्यवस्थापक सुरेश सुगावे, भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक शिंदे, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक गणेश मेकरे यांच्यासह सर्व ग्रामसखी आणि महिला बचत गटांच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मेळाव्यात महिलांनी विविध उद्योग संकल्पनांबाबत उत्सुकता दाखवत कर्ज व अनुदान प्रक्रियेची माहिती घेतली.

या उपक्रमामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील महिलांना स्वावलंबन, आर्थिक प्रगती आणि रोजगारनिर्मितीच्या दिशेने नवी प्रेरणा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा कर्ज मेळावा प्रभावी आणि प्रेरणादायी उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande