
अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.) | सहकार क्षेत्रात नेहमीच केंद्रबिंदू ठरलेल्या दर्यापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक मोठा राजकीय भूकंप टळला. बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांच्याविरोधात विरोधी गटाने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव आवश्यक संख्याबळाअभावी बारगळला. १२ संचालकांची गरज असताना प्रत्यक्ष प्रक्रियेदरम्यान एक संचालक अनुपस्थित राहिल्याने हा प्रस्ताव नामंजूर झाला. त्यामुळे सुनील पाटील गावंडे हेच सभापतीपदी कायम राहणार आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून सभापती सुनील पाटील गावंडे हे सर्व संचालकांना सोबत घेऊन बाजार समितीचा कारभार सुरळीत चालवत होते. दरम्यान तालुक्यातील एका ज्येष्ठ नेत्याने आखलेल्या विशेष राजकीय रणनीतीनंतर बाजार समितीतील १२ संचालकांनी एकत्र येत सभापतींविरोधात बंड पुकारले आणि अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला. विरोधी गटातील १२ संचालकांनी स्वाक्षऱ्यांचे पत्र जिल्हा निबंधकांकडे सादर करून अविश्वास ठरावाची मागणी केली होती. त्या अनुषंगाने ३१ जुलै रोजी जिल्हा निबंधक राजेंश भुयार यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अविश्वास प्रस्तावावरील कायदेशीर प्रक्रिया पार पडली. सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. अविश्वास ठराव मंजूर करून सभापतींना पदावरून हटवण्यासाठी विरोधी गटाला १२ संचालकांची पूर्ण उपस्थिती व पाठिंबा आवश्यक होता. मात्र, प्रक्रियेच्या ऐनवेळी १२ पैकी एक संचालक गैरहजर राहिला. त्यामुळे आवश्यक संख्याबळाची अट पूर्ण न झाल्याने सुनील गावंडे सभापतीपदी कायम झाल्याने जिल्हा निबंधक राजेश भुयार यांनी हा अविश्वास प्रस्ताव बारगळल्याचे स्पष्ट केले.
एक संचालक अनुपस्थित राहिल्याने डाव उलटला
ऐनवेळी एका संचालकाने मारलेली दांडी विरोधी गटासाठी मोठा धक्का मानली जात आहे. तर दुसरीकडे सभापती सुनील पाटील गावंडे यांनी आपले पद राखण्यात यश मिळवले आहे. अविश्वास प्रस्ताव उधळला गेल्याने गावंडे समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे अनुपस्थित राहिलेल्या त्या एका संचालकाबद्दल राजकीय वर्तुळात तर्क-वितर्काना उधाण आले आहे.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी