वांगदरी ग्रामपंचायतीला राज्याचा ‘आदिशक्ती पुरस्कार’
महिला व बालविकासातील उल्लेखनीय कार्याचा गौरव लातूर, १ ऑगस्ट (हिं.स.) : महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तळागाळात प्रभावी काम केल्याबद्दल रेणापूर तालुक्यातील वांगदरी ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘आदिशक्ती पुरस्कार’ जाहीर झ
आदिशक्ती पुरस्कार


महिला व बालविकासातील उल्लेखनीय कार्याचा गौरव

लातूर, १ ऑगस्ट (हिं.स.) : महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तळागाळात प्रभावी काम केल्याबद्दल रेणापूर तालुक्यातील वांगदरी ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘आदिशक्ती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या घोषणेमुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सरपंच विजय गंभीरे, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महिला व बालकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने ‘आदिशक्ती अभियान’ राबविले आहे. या अभियानाअंतर्गत महिलांसाठीच्या विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कुपोषण व मातृ-मृत्यूदरात घट, तसेच बालविवाह आणि महिला अत्याचारासारख्या सामाजिक समस्यांचे निर्मूलन करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

या अभियानाच्या माध्यमातून महिलांना शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणे, त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे.

वांगदरी ग्रामपंचायतीने या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करत गावातील महिला व बालकांसाठी आरोग्य शिबिरे, पोषणविषयक जनजागृती, शालेय मुलींच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना तसेच शासकीय योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य केले. या उपक्रमांमुळे गावात सकारात्मक बदल घडून आल्याची दखल शासनाने घेत प्रथम क्रमांकाचा ‘आदिशक्ती पुरस्कार’ जाहीर केला आहे.

या यशामुळे सरपंच विजय गंभीरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्तरीय समिती आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला आहे.

आदिशक्ती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाने ग्राम, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर विशेष समित्यांची स्थापना केली आहे. या समित्या योजनांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेऊन अडचणी दूर करण्याचे काम करणार आहेत. तसेच महिलांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आदिशक्ती पुरस्कार’ योजना सुरू करण्यात आली आहे.

वांगदरी ग्रामपंचायतीला मिळालेला हा सन्मान राज्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरणार असून महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना नवसंजीवनी देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande