
कोल्हापूर, १ ऑगस्ट (हिं.स.) : राज्यातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ट्रॉमा केअर युनिट आणि स्त्री रुग्णालयांसह विविध आरोग्य सुविधा येत्या १५ ऑगस्ट रोजी नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आणि तातडीच्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.
प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी ८० टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थांना युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम पूर्णत्वास येत असतानाच आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री, फर्निचर, मनुष्यबळ आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनी मोठ्या प्रमाणावर आरोग्य संस्थांचे एकत्रित लोकार्पण होणार आहे.
जत, घनसावंगी, अंबड, बदलापूर-खर्डी, मोखाडा, डहाणू, सांगोला, कोंढाळ, ब्रह्मपुरी, वाडी (बु.), वाशीम आणि धुळे येथील आरोग्य संस्था उद्घाटनासाठी सज्ज आहेत. तसेच चंद्रपूर, पुणे, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांतील आधुनिक ट्रॉमा केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्रशिक्षण केंद्रेही नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेली नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट्सची कामेही पूर्ण झाली आहेत. नागपूर, गडचिरोली, सांगली, सिंधुदुर्ग, नांदेड आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये आवश्यक वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ आणि प्रशासकीय पूर्तता करण्यात आल्याने या सर्व संस्था कार्यान्वित होण्यासाठी सज्ज आहेत.
या सुविधांमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे जावे लागणार नाही. अपघातग्रस्त, हृदयविकाराचे रुग्ण, माता-बालक तसेच आपत्कालीन रुग्णांना स्थानिक पातळीवरच वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध होणार आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनाही अधिक सुसज्ज कार्यपरिसर मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. अनेक वर्षे विविध कारणांमुळे रखडलेल्या आरोग्य संस्थांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात आली असून उर्वरित प्रकल्पांचेही आरोग्य संवाद यात्रेदरम्यान टप्प्याटप्प्याने लोकार्पण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणारे हे विक्रमी लोकार्पण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा हे राज्य शासनाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साकार करण्याच्या दिशेने हे पाऊल असल्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar