
पालघर, 01 ऑगस्ट (हिं.स.) - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत श्री. गोपाळ चौधरी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती वसई यांची 132 नालासोपारा विधानसभा मतदारसंघासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (Assistant Electoral Registration Officer – AERO) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र, नियुक्तीनंतर त्यांनी कोणतीही पूर्वसूचना अथवा सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी न घेता आपल्या कर्तव्यावर गैरहजर राहून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील कोणतेही कामकाज केले नाही. तसेच SIR कार्यक्रमातील कामात हलगर्जीपणा, दुर्लक्ष, कामात टाळाटाळ व कर्तव्यात कसूर केल्यामुळे संबंधित विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक कामकाजावर प्रतिकूल परिणाम होऊन काम अपूर्ण राहिले.
या बाबीची गंभीर दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर यांनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 नियमांनुसार शिस्तभंगाची कार्यवाही करत त्यांना तात्काळ निलंबित करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद पालघर याना निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानुसार निलबनाचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद पालघर यांचे कडून काढण्यात येत आहेत.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा भारत निवडणूक आयोगाचा अत्यंत महत्त्वाचा आणि कालबद्ध कार्यक्रम असून, या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा, कामात टाळाटाळ अथवा कर्तव्यात कसूर खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध नियमानुसार शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. — जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी