
सोलापूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने कार्यालयीन शिस्त आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवार, ३ ऑगस्टपासून महापालिकेतील वर्ग ‘ब’ ते ‘ड’ मधील सर्व कायमस्वरूपी, मानधन आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणवेश परिधान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून दररोज १०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. महापौर विनायक कोंड्याल यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अधिकारी आणि कर्मचारी यांची सहज ओळख व्हावी, तसेच प्रशासकीय कामकाजात शिस्त आणि एकरूपता निर्माण व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नवीन नियमांनुसार पुरुष कर्मचाऱ्यांसाठी निळ्या रंगाचा रेषा असलेला शर्ट आणि गडद निळी (नेव्ही ब्लू) पँट, तर महिला कर्मचाऱ्यांसाठी फिकट जांभळ्या रंगाची साडी किंवा पंजाबी ड्रेस असा गणवेश निश्चित करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड