
कचरा व प्लास्टिक नियमभंगावर दंडात्मक कारवाई
परभणी, 01 ऑगस्ट (हिं.स.) : परभणी शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी परभणी शहर महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन नियम तसेच प्लास्टिक बंदी नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. नागरिक, व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक संस्था आणि आस्थापनांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिला आहे.
महापालिकेने जारी केलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास ५०० रुपये, घरगुती कचरा रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत टाकल्यास २०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २०० रुपये, तर उघड्यावर शौच केल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.कचरा, पाने किंवा प्लास्टिक जाळणाऱ्यांवर ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर, साठवणूक, विक्री किंवा वितरण केल्यास पहिल्या वेळी ५ हजार रुपये, दुसऱ्या वेळी १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा नियमभंग झाल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंड आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.रस्ते किंवा नाल्यांमध्ये बांधकामाचा मलबा टाकल्यास ३ हजार रुपये, तर सार्वजनिक ठिकाणी घाण करणे किंवा मूत्रविसर्जन केल्यास २०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेने नागरिकांना ओला, सुका आणि घातक कचरा वेगवेगळा करून घंटागाडीत देण्याचे आवाहन केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, कचरा जाळू नये आणि बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.आयुक्त नितीन नार्वेकर यांनी नागरिकांनी स्वच्छता नियमांचे पालन करून स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक परभणी घडविण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis