
अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.)
सध्याचे युग डिजिटल असून प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध होत आहे. मात्र, स्वतःचे आत्मपरीक्षण करून आपल्यातील गुण-दोष ओळखणे आवश्यक आहे. आयुष्यात कधी थांबून विचार करण्याची सवय लावा. ‘सोशल मीडियावर रील्स पाहण्यापेक्षा आयुष्याचा कंटेंट निश्चित करून ध्येय गाठा, ’ असे आवाहन पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी केले. जागतिक अवैध मानवी वाहतूक प्रतिबंध दिनानिमित्त तिवसा तहसील कार्यालयात आयोजित ‘ऑपरेशन कवच’ उपक्रमात ते बोलत होते. शिक्षण, नोकरी किंवा इतर आमिषांना बळी न पडता कोणतीही माहिती पडताळून पाहावी आणि अडचणीच्या प्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. मयूर कळसे होते. व्यासपीठावर ठाणेदार गोपाल उपाध्ये, तुलसी झुजरकर, यादव देशमुख महाविद्यालयाचे योगेश देशमुख तसेच कृष्णाबाई दंडाळे विद्यालयाच्या संचालिका छाया दंडाळे उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी