
सोलापूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।
शासनाच्या सेवा अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना काही सरकारी कार्यालयांमध्ये दलालांचा हस्तक्षेप वाढत असल्याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी चिंता व्यक्त केली आहे. सरकारी कार्यालयांतील दलाली तातडीने थांबवावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
मंद्रूप येथे महसूल आणि विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला तहसीलदारांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार देशमुख यांनी नागरिकांची कामे विनाकारण प्रलंबित ठेवू नयेत, प्रत्येक अर्जाची वेळेत पूर्तता करावी आणि नागरिकांना सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
काही कार्यालयांमध्ये अधिकारी वेळेत कामे करत नसल्याने नागरिकांना नाईलाजाने दलालांची मदत घ्यावी लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारी कार्यालयांमध्ये दलाल कार्यरत असल्यास त्यांची नावे जाहीर करावीत. तसे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड