
५ ऑगस्ट रोजी निदर्शने व आदरांजली सभा
नाशिक, 01 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढलेल्या अपघातांच्या घटना, पाच नागरिकांचा मृत्यू आणि रस्ते सुरक्षेच्या गंभीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर संविधानप्रेमी नाशिककर यांच्या वतीने नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन तसेच महापौर कार्यालयाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध विकासकामे सुरू असली तरी नियोजनाच्या अभावामुळे अनेक रस्ते एकाच वेळी खोदून ठेवण्यात आले आहेत. पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे, चिखल आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, गेल्या चार महिन्यांत खड्ड्यांमुळे पाच निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच दररोज शेकडो नागरिक लहान-मोठ्या अपघातांत जखमी होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
संविधानप्रेमी नाशिककरांनी मनपा प्रशासनाकडे तातडीने शहरातील सर्व खड्डे बुजविण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, निष्काळजी कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करणे, सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी माहिती फलक लावणे, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देणे, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च प्रशासनाने उचलणे, संवेदनशील चौकांमध्ये होमगार्ड्सची नियुक्ती करणे तसेच रस्त्यांच्या कामांच्या परिसरात पथदीप व रिफ्लेक्टरची प्रभावी व्यवस्था करण्याची मागणी केली.
प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
दरम्यान, या मागण्यांसाठी ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, नाशिक येथे मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येणार असून, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संविधानप्रेमी नाशिककर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी कॉम्रेड राजू देसले, ॲड. प्रभाकर वायचळे, ॲड. बंडू डांगे, ॲड. निलेश सोनवणे, ॲड. प्राजक्ता कापडणे, ॲड. कृष्णा शीलावट, अजमल खान, ॲड. राम बागुल, फरीद शेख, परवेज शेख यांच्यासह संविधानप्रेमी नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV