


रायगड, 01 ऑगस्ट (हिं.स.)। महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. अलिबाग येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' व महसूल दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमास खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, महेंद्र दळवी, विक्रांत पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांत 'महाराजस्व अभियान' राबविण्यात येत असून महसूल विभाग हा जनतेच्या मालमत्तेचे संरक्षण करणारा महत्त्वाचा विभाग आहे. महिलांसाठी 'शेतकरी सन्मान कार्ड', शेतपाणंद रस्त्यांचे सीमांकन व नोंदणी, तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी, स्वामित्व योजनेतून मोफत मोजणी, रहिवासी घरे कायदेशीर करण्याची प्रक्रिया आणि वनहक्कधारकांना सातबारा देण्यासारखे उपक्रम गतीने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
खासदार सुनील तटकरे यांनी महसूल विभागाच्या लोकाभिमुख कार्याचे कौतुक केले, तर मंत्री भरत गोगावले यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा गौरव केला. मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्येक पंचायत समिती स्तरापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात विविध शासकीय विभागांच्या माहितीपर स्टॉल्सची पाहणी करण्यात आली. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)