
महापुरुषांचे विचार आत्मसात करा, त्यांना जातीत बांधू नका - अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंचे आवाहन
जात किंवा आडनावाने नाही तर कर्तृत्वाने आपली ओळख व्हावी, असे काम करून दाखवा - पंकजा मुंडे
बीड, 01 ऑगस्ट (हिं.स.)। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वंचित - उपेक्षितांना बळ दिले, आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांच्या वेदनांना फुंकर घातली, अशा जागतिक कीर्तीच्या थोर व्यक्तीचे स्मारक व सामाजिक सभागृह उभारण्यासाठी ५ गुंठे जागा नगर परिषदेस उपलब्ध करून देणार असून या आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात या कामासाठी २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे धनंजय मुंडे यांनी परळीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.
महापुरुषांना आपण जातीत वाटून घेतले आहे, मात्र परळीची संस्कृती वेगळी आहे. इथे शिवजयंतीचा अध्यक्ष आम्ही मुस्लिम समाजातील व्यक्तीला बनवतो. थोडक्यात महापुरुषांना आपण जातीत बांधून न घेता त्यांचे विचार आत्मसात करून सामाजिक प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले. परळी वैद्यनाथ शहरातील साठेनगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ना. पंकजाताई मुंडे याही उपस्थित होत्या.
पंकजाताई मुंडे यांनी बोलताना, शिक्षणा चे महत्त्व पटवून सांगितले तसेच तरुणाईला व्यसनमुक्तीचे आवाहन केले. अण्णाभाऊ साठे यांच्या चारित्र्याचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आम्हा सर्वांना आहे. आज माणसाने स्वतःला वेगवेगळ्या रंगात वाटून घेतले आहे. पण जात, आडनाव यापेक्षा आपली ओळख ही आपल्या कर्तृत्वाने झाली पाहिजे, यासाठी परिश्रम घेण्याची तयारी ठेवा, असा मोलाचा संदेश पंकजाताई मुंडे यांनी दिला.
धनंजय मुंडे यांनी यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना आणि कार्याला उजाळा देत अनेक दाखले दिले. अत्यंत उत्साहात हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, बाजीराव धर्माधिकारी, जुगलकिशोर लोहिया, अजय मुंडे, प्रा. विनोद जगतकर यांसह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तसेच परळी वैद्यनाथ शहरातील ज्येष्ठ पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis