

रायगड, 01 ऑगस्ट (हिं.स.)। कर्जत शहरातील प्रमुख चौकात उभारण्यात आलेली अत्याधुनिक वाहतूक सिग्नल यंत्रणा अद्यापही कार्यान्वित न झाल्याने शहरात दररोज भीषण वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी माथेरान, भिवपुरी, कोंडाणा लेणी तसेच परिसरातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे शहरातील मुख्य चौकात तासन्तास वाहनांच्या रांगा लागतात. याचा मोठा फटका स्थानिक नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि व्यापाऱ्यांना बसत आहे.
सिग्नलचे खांब, दिवे आणि यंत्रणा उभारून अनेक महिने उलटले, मात्र ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी वाहतूक पोलिसांवर ताण वाढला असून अनेकदा पोलिसांच्या अनुपस्थितीत चौकात गोंधळाचे वातावरण निर्माण होते. किरकोळ अपघात आणि वादावादीच्या घटनाही वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा सिग्नल सुरू करण्याची मागणी केली असतानाही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली यंत्रणा धूळ खात पडली आहे, तर दुसरीकडे नागरिकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कर्जत हे वेगाने विकसित होणारे शहर असून पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. अशा परिस्थितीत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे. संबंधित प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस आणि नगर प्रशासनाने समन्वय साधून सिग्नल तातडीने कार्यान्वित करावा, अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे. अन्यथा ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत असून, प्रशासनाला अखेर जाग कधी येणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)