
रायगड, 01 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण हक्क आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय रायगड आणि होप फॉर द चिल्ड्रन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील विशेष बाल पोलीस पथक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाइन रायगडच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
दि. २९ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यशाळेत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ (सुधारित २०२१), लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२, बालमजुरी, बालविवाह तसेच बालकांवरील उपेक्षा, हिंसा, अन्याय आणि शोषण रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती सुहिता ओव्हाळ यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना बाल संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी समन्वय आणि संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले. यावेळी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती तनुष्का पेडणेकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता सपकाळ, विशेष बाल पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रशिक्षणात रायगड जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक अधिकारी व एक अंमलदार अशा विशेष बाल पोलीस पथकातील एकूण ८३ अधिकारी व कर्मचारी, तसेच बाल कल्याण समितीचे सदस्य, जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी-कर्मचारी, संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाइनचे प्रतिनिधी सहभागी झाले.
बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्यावरील अत्याचारांना आळा घालणे आणि विविध कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)