
छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त शेलगाव, ता. बदनापूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यातून समता, सामाजिक न्याय, स्वाभिमान आणि मानवतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविला. वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला संघर्ष आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त साकारलेला हा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा कायमस्वरूपी प्रेरणास्त्रोत ठरेल. असे आमदार कुचे म्हणाले
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्वसमावेशक विकासाची प्रेरणा त्यांच्या कार्यातून सतत मिळत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी सहदेव बापू अंभोरे, अर्जुन उडान, बबलू शेख, मनोज अंभोरे, विशाल सोनवणे, सुरेश घोरपडे, निलेश सोनवणे, शुक्लाल गैराव, उत्सव समितीचे अध्यक्ष सुहास गायकवाड, उपाध्यक्ष अविनाश घोरपडे, विकास भिसे, पृथ्वीराज आरसूळ, सुमित घोरपडे, आकाश सगट, संदेश घोरपडे, दावीत घोरपडे, सुभाष सगट तसेच ग्रामस्थ, समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजहित, शिक्षण, सामाजिक समता आणि विकासाची वाटचाल अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis