
सोलापूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन रविवारी, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता डी-मार्टचे संचालक एन. भास्करन यांच्या हस्ते होणार आहे. यापूर्वी नूतनीकरणानंतर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, वातानुकूलित औषधालय, वीस खाटांचा वॉर्ड, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, सीटी स्कॅन विभाग आणि कॅन्टीन सुरू करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात झालेल्या प्रगतीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रुग्णालयातील नव्या सुविधा सादर करण्यात आल्या.
सध्या रुग्णालयात ७४ खाटांचा आंतररुग्ण विभाग, ३० खाटांचे तीन अतिदक्षता विभाग (ICU), वातानुकूलित व स्वतंत्र रुग्णकक्ष, प्रसूती विभाग, कॅज्युअल्टी आणि सर्वसाधारण वॉर्ड कार्यरत आहेत. शहरातील ६७ तज्ज्ञ डॉक्टर येथे सेवा देत असून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर्स, एक्स-रे, सोनोग्राफी आणि मेडिकल गॅस पाईपलाईनची सुविधा उपलब्ध आहे. एनएचपीसीएलच्या सहकार्याने आठ खाटांचे आधुनिक डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले असून, डी-मार्ट फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्याने अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि सर्जिकल युनिट उभारण्यात आले आहे. तसेच एलआयसी गोल्डन ज्युबिली फाउंडेशनच्या सहकार्याने जर्मनीतून कार्ल झाईस कंपनीचा आधुनिक ऑपरेटिंग मायक्रोस्कोपही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
रुग्णांना वाजवी दरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा न्यासाचा उद्देश असल्याचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले. लवकरच कॅथलॅब, आधुनिक हृदयरोग विभाग आणि नवजात शिशु अतिदक्षता विभाग देखील कार्यान्वित होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड