विद्यार्थ्यांचा थरारक प्रवास, पुलाअभावी शिक्षणच धोक्यात
बीड, 01 ऑगस्ट (हिं.स.)। शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे असे शासन वारंवार सांगते. मात्र परळी तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथील आरसुळे वस्तीवरील विद्यार्थ्यांचे वास्तव या दाव्याला छेद देणारे आहे. पाऊस सुरू झाला की या चिमुकल्यांच्या शिक्ष
शिक्षणासाठी खडतर प्रवास


बीड, 01 ऑगस्ट (हिं.स.)।

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे असे शासन वारंवार सांगते. मात्र परळी तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथील आरसुळे वस्तीवरील विद्यार्थ्यांचे वास्तव या दाव्याला छेद देणारे आहे. पाऊस सुरू झाला की या चिमुकल्यांच्या शिक्षणावर अक्षरशः पाणी पडते. शाळेत पोहोचण्यासाठी त्यांना चिखल तुडवत किंवा पाण्याच्या प्रवाहातून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गाढेपिंपळगाव आणि आरसुळे वस्तीच्या दरम्यान पापनाशी नदी वाहते. सुमारे पंचवीस-तीस वर्षांपूर्वी नदीपलीकडे काही कुटुंबांनी वास्तव्यास सुरुवात केली. कालांतराने ही वस्ती वाढत गेली असून आज येथे जवळपास २० ते २५ कुटुंबे राहतात. मात्र लोकसंख्या वाढली, वस्ती वाढली; पण मूलभूत सुविधा मात्र आजही पोहोचलेल्या नाहीत. उन्हाळा आणि हिवाळ्यात नागरिक नदीत भराव टाकून तयार झालेल्या तात्पुरत्या रस्त्याने ये-जा करतात. पण पावसाळा सुरू झाला की हा मार्ग पूर्णपणे बंद होतो. अशा परिस्थितीत वस्तीवरील १५ ते २० शाळकरी विद्यार्थ्यांना रोज शाळेत जाण्यासाठी चिखलाने भरलेल्या पायवाटेचा किंवा पाण्याने भरलेल्या नदीपात्राचा पर्याय स्वीकारावा लागतो. हा प्रवास म्हणजे शिक्षणासाठी दिली जाणारी जीवाची बाजीच ठरत आहे.

अलीकडेच या विद्यार्थ्यांचे नदीच्या प्रवाहातून आणि चिखलातून शाळेत जातानाचे काही हृदय पिळवटून टाकणारे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. हे दृश्य पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला असून, विकासाच्या गप्पा करणाऱ्या प्रशासन या मुलांकडे कधी लक्ष देणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पापनाशी नदीवर कायमस्वरूपी पुलाची मागणी करत आहेत. गाढेपिंपळगाव आणि आरसुळे वस्तीला जोडणारा पूल उभारल्यास केवळ विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर संपूर्ण वस्तीतील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

शासन 'सर्वांना शिक्षण'चा नारा देते; परंतु या विद्यार्थ्यांना अजूनही सुरक्षित रस्ता आणि पूल मिळालेला नाही. शिक्षणाच्या हक्कासाठी केवळ योजना जाहीर करून चालणार नाही, तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या मूलभूत सुविधा उभारणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून पापनाशी नदीवरील पुलाचे काम मंजूर करावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि पालकांकडून होत आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande