
अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.) - जीवनात गुरूचे अधिक महत्व आहे. गुरूंमुळेच मी घडले आणि माझे स्वप्न पूर्णत्वास आले. आपल्या गुरूंची कौतुकाची थाप नेहमीच आपल्या पाठीवर राहिली आहे, असे सांगून युवा शक्ती हीच देशाची मोठी ताकद आहे. बक्षिस हे खरे तर प्रोत्साहन असते, असेच पुरस्कार विद्याथ्र्यांनी मिळवावे, असे आवाहन प्रसिध्द गायिका वैशाली माडे यांनी केले.
सत्र 2025-26 मध्ये मध्य विभाग, अखिल भारतीय व राष्ट्रीय कव्वाली आंतर विद्यापीठ अशा विविध स्पर्धांमध्ये अभूतपूर्व यश संपादन करुन प्राविण्य प्राप्त करणा-या विद्यार्थीकलावंत, साथिदार, प्रशिक्षक व चमू व्यवस्थापक यांचा कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करतांना व्य.प. सदस्य डॉ. रविंद्र कडू म्हणाले, विद्याथ्र्यांनो, स्वप्न पहा आणि ते पूर्ण करा. अमरावतीची हीच परंपरा राहिलेली आहे. अमरावती विद्यापीठाचे नाव सदैव पुढेच राहिले आहे, त्यासाठी अनेकांनी मोठे योगदान दिले आहे, असे सांगून त्यांना सर्व विद्यार्थी कलावंतांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. कुलसचिव डॉ. अविनाश असनारे म्हणाले, वैशाली माडे ह्रा विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीनी आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार विद्यापीठाला मिळवून दिला आहे. गायनाच्या माध्यमातून वैशाली माडे यांनी अमरावती जिल्ह्राचा जगभरात नावलौकीक केला आहे, असे सांगून डॉ. असनारे यांनी सर्व विद्यार्थी कलावंत, साथिदार आणि चमू व्यवस्थापकांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी विद्यापीठाच्यावतीने वैशाली माडे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देवून कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सत्कार केला. तसेच 2025-26 मध्ये मध्य विभाग, अखिल भारतीय व राष्ट्रीय कव्वाली आंतर विद्यापीठ अशा विविध स्पर्धांमध्ये अभूतपूर्व यश संपादन करुन प्राविण्य प्राप्त करणा-या विद्यार्थी कलावंत, साथिदार, चमू व्यवस्थापक, प्रशिक्षक व इतरांचा रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी