
छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोलटगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या ज्योती सुधाकर शिंदे (दहीहंडे) यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने निकालांती अवैध ठरविल्याने त्यांचे जि.प. सदस्यत्व धोक्यात आले. समितीचे अध्यक्ष देवाप्पा गावडे, सदस्य डॉ. दीपक खरात, सदस्य सचिव देवीदास कोकाटे यांनी सच्चिदानंद ऊर्फ सचिन साहेबराव खलसे (रा. कारोळ, पो. गोलटगाव) यांनी २३ एप्रिल २०२६ रोजी शिंदे यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी केलेल्या तक्रारीवर सुनावणी घेत निकाल दिला.प्रहारच्या तिकिटावर ज्योती शिंदे निवडून आल्या होत्या. प्रमाणपत्रासाठी शिंदे यांनी मुख्याध्यापक, शिवछत्रपती विद्यालय, संभाजीनगर येथील 'ज्योती श्रीधर दहीहंडे' या नावाने दिलेला शाळा प्रवेश निर्गम उतारा सादर केला होता. ज्यामध्ये जात पडताळणी समितीला काही त्रुटी आढळल्या. निर्णयामुळे ज्योती शिंदे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व धोक्यात आले असून, पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis