
बीड, १३ ऑगस्ट (हिं.स.) : नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माजरसुंबा पुलाखाली बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणाचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या एका दिवसात आरोपी महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून चोरीस गेलेली सुमारे एक तोळा वजनाची सोन्याची पोत व मणी असा अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मोरगाव (ता. जि. बीड) येथील आसाराम बाबासाहेब कागदे हे १२ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९ वाजता पत्नीसमवेत देवदर्शनासाठी जात होते. माजरसुंबा पुलाखाली बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. परिसरातील उपलब्ध माहितीच्या आधारे संशयित महिलेचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, तिच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास नेकनूर पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis