

रायगड, 13 ऑगस्ट (हिं.स.)। 20 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून विविध कारणांसाठी पैसे उकळत बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याचा प्रकार रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहा तालुक्यातील सुडकोली, चणेरा येथील फिर्यादी यांच्याशी एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवरून संपर्क साधला. आपण वीस लाख रुपयांचे कर्ज मिळवून देऊ, असे सांगून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी शेअर्स घ्यावे लागतील, स्टॅम्प पेपर खरेदी करावा लागेल तसेच इन्शुरन्स काढावा लागेल, अशी वेगवेगळी कारणे सांगण्यात आली.
या कारणांसाठी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने एकूण ४६ हजार ४०० रुपये घेण्यात आले. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने हुंडाई व्हर्ना कार क्रमांक एमएच ०५ बीएल ००९५ मधून येऊन फिर्यादीच्या बांधकाम साहित्याची पाहणी केली. यामुळे कर्ज मंजूर होणार असल्याचा फिर्यादीचा विश्वास आणखी दृढ झाला.
पाहणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीने कर्ज मंजूर झाले असून लवकरच कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा होईल, असे सांगितले. मात्र, आजपर्यंत कोणतीही कर्जाची रक्कम खात्यात जमा झाली नाही. तसेच अस्तित्वात नसलेल्या ‘पतसंस्था मर्यादित, पालघर’ या संस्थेच्या नावाने शेअर्स दिल्याचे आणि कर्ज मंजूर झाल्याचे बनावट कागदपत्रे देण्यात आल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि श्री. खाडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)