नाशिक : साधूच्या वेशात आलेल्यांनी वृद्धाला भुरळ पाडून सोन्याची चेन, अंगठी लांबविली
नाशिक, 13 ऑगस्ट (हिं.स.)।साधूच्या वेशात आलेल्या दोघांनी वृद्धाला भुरळ पाडून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील अंगठी लांबविल्याची घटना आडगाव शिवारात घडली. या प्रकरणी नरेंद्र हेरंबाजी कामनवार (वय 69, रा. पार्कसाइड होम्स, हनुमाननगर, आडगाव शिव
नाशिक : साधूच्या वेशात आलेल्यांनी वृद्धाला भुरळ पाडून सोन्याची चेन, अंगठी लांबविली


नाशिक, 13 ऑगस्ट (हिं.स.)।साधूच्या वेशात आलेल्या दोघांनी वृद्धाला भुरळ पाडून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील अंगठी लांबविल्याची घटना आडगाव शिवारात घडली. या प्रकरणी नरेंद्र हेरंबाजी कामनवार (वय 69, रा. पार्कसाइड होम्स, हनुमाननगर, आडगाव शिवार) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कामनवार हे रायते हॉस्पिटलजवळून बळी मंदिर रोडकडून पार्कसाइड नेस्ट इमारतीकडे पायी जात होते. त्यावेळी पांढर्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून दोन जण तेथे आले. त्यातील एक जण कारचालक असून, त्याचे वय अंदाजे 35 ते 45 वर्षे आहे. दुसरा इसम साधूच्या वेशात असून, त्याचे वय अंदाजे 40 ते 50 वर्षे आहे. त्याने अंगाला राख लावलेली होती.

साधूच्या वेशातील इसमाने आपण साधू असल्याचे सांगून कामनवार यांच्या डोक्यावर हात फिरविला. त्यानंतर त्यांना भुरळ पाडून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. त्यानंतर दोघेही कारमधून पसार झाले.

चोरट्यांनी लांबविलेल्या ऐवजामध्ये सुमारे 60 हजार रुपये किमतीची, दीड तोळे वजनाची ओमचे लॉकेट असलेली सोन्याची चेन आणि 20 हजार रुपये किमतीची, पाच ग्रॅम वजनाची बदामाच्या आकाराची सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे. एकूण 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणाचा तपास आडगाव पोलीस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande