जळगाव जिल्ह्यात ७ गावठी कट्ट्यांसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव, १३ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह बेकायदेशीर शस्त्रांच्या वापराला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी गुरुवारी सकाळी ‘ऑपरेशन ३/२५’ ही विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गद
जळगाव जिल्ह्यात ७ गावठी कट्ट्यांसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त


जळगाव, १३ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह बेकायदेशीर शस्त्रांच्या वापराला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी गुरुवारी सकाळी ‘ऑपरेशन ३/२५’ ही विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कारवाईत ७ गावठी कट्टे, ११ जिवंत काडतुसे, चाकू, तलवार, २५ मोबाईल फोन आणि ३ मोटारसायकली असा एकूण ७ लाख १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गेल्या दहा वर्षांत भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल असलेल्या तसेच बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या वापराशी संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची माहिती पोलिसांनी संकलित करून तिचे विश्लेषण केले होते. या माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तींची यादी तयार करण्यात आली.

या यादीतील व्यक्तींच्या वास्तव्याच्या ठिकाणी तसेच त्यांच्या ताब्यातील वाहनांची कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासणी करण्यात आली. संबंधितांनी शस्त्रे स्वतःकडे न ठेवता मित्र, नातेवाईक किंवा परिचितांकडे लपवून ठेवली आहेत का, याचीही उपलब्ध माहितीच्या आधारे आवश्यक ठिकाणी पडताळणी करण्यात आली.

‘ऑपरेशन ३/२५’ला १३ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजता सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथके एकाच वेळी रवाना करण्यात आली. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत शस्त्र बाळगणे किंवा शस्त्रांच्या माध्यमातून गुन्हे करण्याच्या पार्श्वभूमीवरील २१४ आरोपींच्या घरांची, वास्तव्याच्या ठिकाणांची आणि ताब्यातील वाहनांची अचानक तपासणी करण्यात आली.या धडक कारवाईत ७ आरोपींवर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंड, १ चाकू, १ तलवार, २५ मोबाईल फोन आणि ३ मोटारसायकलींचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यातही अशाच प्रकारच्या अचानक आणि माहितीआधारित मोहिमा राबवून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांच्या विशेष पथकांनी संयुक्तपणे राबवली.

-------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande