
‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलसमृद्ध महाराष्ट्र घडवा’चा संदेश
नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
नंदुरबार, १८ ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्रातील जलक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी २१ ऑगस्ट हा दिवस राज्यभरात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पाणी अडवणे, पाणी जिरवणे आणि भूजल पुनर्भरण या संकल्पनांना लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाची मुख्य संकल्पना ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलसमृद्ध महाराष्ट्र घडवा’ या घोषवाक्यासह वॉकॅथॉन आयोजित करण्यात येणार आहे. ही माहिती मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश पाटील यांनी दिली.
जी.टी.पी. कॉलेजपासून वॉकॅथॉनला प्रारंभ
वॉकॅथॉनचा प्रारंभ जी.टी.पी. कॉलेज ग्राउंड येथून होणार असून अंधारे स्टॉप, नेहरू चौक, महाराणा प्रताप चौक, मार्केट रोड मार्गे खोडाईमाता मंदिर असा मार्ग राहणार आहे. त्यानंतर पुन्हा जी.टी.पी. कॉलेज ग्राउंड येथे वॉकॅथॉनचा समारोप होईल.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
सकाळी ६. वा. – कार्यक्रमस्थळी आगमन
सकाळी ६.१५ वा. – वॉर्म-अप
सकाळी ६.४५ वा. – मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ
सकाळी ७ वा. – मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा
दाखवून वॉकॅथॉनला प्रारंभ
सकाळी ८. वा. – वॉकॅथॉनचा समारोप
सकाळी ८.३० वा. – पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण तसेच आभार प्रदर्शन
सर्व नागरिकांना सहभागाचे आवाहन
वयाची १५ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. लोकप्रतिनिधी, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, खेळाडू, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, स्वयंसेवी संस्था, रोटरी व लायन्स क्लब, महिला बचत गट तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या जलचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहभागासाठी क्यूआर कोड आधारित ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देण्यात येणार असून, प्रथम दहा विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
जलसंधारणाचा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक व्यापक करण्यासाठी #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्यात येणार असल्याचेही कार्यकारी अभियंता निलेश पाटील यांनी कळविले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर