तुषार सायानी अपघात प्रकरणात चार महिन्यांनंतरही आरोपी मोकाट
अकोला, 18 ऑगस्ट (हिं.स.) : अकोल्यातील तुषार सायानी यांच्या अपघाती मृत्यूला चार महिने उलटूनही या प्रकरणातील आरोपी वाहनचालकाचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करून न्याय मिळावा, यासा
तुषार सायानी अपघात प्रकरणात चार महिन्यांनंतरही आरोपी मोकाट


अकोला, 18 ऑगस्ट (हिं.स.) : अकोल्यातील तुषार सायानी यांच्या अपघाती मृत्यूला चार महिने उलटूनही या प्रकरणातील आरोपी वाहनचालकाचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करून न्याय मिळावा, यासाठी आई-वडिलांवर धरणे आंदोलन करण्याची वेळ येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

गेल्या २० एप्रिल रोजी रात्री औद्योगिक वसाहत परिसरात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तुषार सायानी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, चार महिने उलटूनही अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध लागलेला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणाचा तपास अधिक गतिमान करून आरोपीचा शोध घ्यावा आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तुषार सायानी यांच्या आई-वडिलांनी केली आहे. त्यांच्या मागणीला सकल गुजराती समाजानेही पाठिंबा दिला असून, कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, तपासात प्रगती होत नसल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा कुटुंबीयांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता पोलीस प्रशासन किती गांभीर्याने पाहते आणि अज्ञात वाहनचालकाचा शोध कधी लागतो, याकडे कुटुंबीयांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande