एसटी आरक्षणासाठी गोरबंजारा समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन
अकोला, 18 ऑगस्ट (हिं.स.) : गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाला पुन्हा वेग येणार आहे. शासनाने या मागणीच्या अभ्यासासाठी समिती स्थापन करून आठ ते दहा महिने उलटले, मात्र सम
Photo


अकोला, 18 ऑगस्ट (हिं.स.) : गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाला पुन्हा वेग येणार आहे. शासनाने या मागणीच्या अभ्यासासाठी समिती स्थापन करून आठ ते दहा महिने उलटले, मात्र समितीने केलेल्या अभ्यासाचा अहवाल किंवा त्याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध झालेली नसल्याने समाजात असंतोष निर्माण झाला आहे.

गोरबंजारा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा दावा करत आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. शासनाने समाजाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर या विषयावर विशेष अभ्यास समिती स्थापन केली होती. मात्र समितीच्या कामकाजाबाबत कोणतीही ठोस माहिती समोर येत नसल्याने शासनाच्या भूमिकेवर समाजबांधवांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर आरक्षणाची मागणी अधिक तीव्र करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भव्य ‘आरक्षण महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून शासनावर दबाव निर्माण करून आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तांडा आणि गावातील ग्रामपंचायतींकडून आरक्षणाच्या मागणीचा ‘एकमुखी ठराव’ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींचे अधिकृत ठराव एकत्रित करून शासनाकडे सादर करण्यात येणार आहेत.

गोरबंजारा समाजाची एकजूट, आरक्षणाची मागणी आणि त्यामागील कायदेशीर व सामाजिक भूमिका शासनासमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी या उपक्रमातून प्रयत्न केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande