
कोला, 18 ऑगस्ट (हिं.स.) : अकोला महानगरपालिका हद्दीतील नव्याने बांधकाम झालेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण, प्रत्यक्ष मोजमाप, नवीन असेसमेंट आणि त्यानंतरची मालमत्ता कर आकारणी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थापत्य व सर्वेक्षण कंपनीने प्रत्यक्ष मोजमाप केले की २०१६-१७ मधील जुन्या डेटाच्या आधारे नोंदी अद्ययावत करण्यात आल्या, असा सवाल उपस्थित करत गटनेते तथा नगरसेवक निलेश देव यांनी महापौर शारदाताई रणजीत भाऊ खेडकर यांच्याकडे या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नव्याने बांधलेल्या अनेक मालमत्ताधारकांना कर आकारणीसंदर्भात मागणीपत्रे व नोटिसा देण्यात आल्या असून, काही प्रकरणांत विलंबाच्या नावाखाली शास्ती किंवा दंड आकारला जात असल्याचे देव यांनी निदर्शनास आणून दिले. सर्वेक्षण कंपनीचा विलंब, चुकीचे मोजमाप किंवा महापालिका प्रशासनातील दिरंगाईचा आर्थिक भार नागरिकांवर टाकणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘दोष कोणाचा आणि दंड कोणाला?’ असा सवाल करत चौकशी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांतील विलंब शास्तीची वसुली स्थगित करावी आणि नागरिकांचा दोष नसल्याचे स्पष्ट झाल्यास आकारलेली शास्ती रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.
२०१६-१७ च्या जुन्या डेटाचा वापर झाला असल्यास तो कितपत अद्ययावत करण्यात आला, प्रत्यक्ष स्थळमोजणीशी त्याचा ताळमेळ घेण्यात आला का आणि कोणत्या अधिकाऱ्याने पडताळणी केली, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक मालमत्तेच्या प्रत्यक्ष मोजमापाची तारीख, मोजमाप पत्रक, छायाचित्रे, डिजिटल/GIS नोंद, बांधकाम क्षेत्रफळ आणि वापराचा प्रकार यांचा अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध करून द्यावा, असे देव यांनी म्हटले आहे.
सर्वेक्षण कंपनीची निविदा, वर्क ऑर्डर, करारनामा, कामाची मुदत, मुदतवाढ, काम पूर्णत्वाचा अहवाल आणि गुणवत्तेचे प्रमाणपत्र तपासून त्रुटी किंवा विलंब आढळल्यास जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आहे. तसेच नव्या मालमत्तांवरील कराची वैधानिक प्रारंभ तारीख, पूर्वलक्षी कर आकारणीचे पुरावे आणि जुन्या-नव्या नोंदीतील तफावत तपासावी.
शहरातील विविध भागांतील मालमत्तांचे नमुना पुनर्मोजमाप करून तफावत आढळल्यास संपूर्ण सर्वेक्षणाची पुनर्तपासणी करावी. नागरिकांना मालमत्ता क्षेत्रफळ, वापर प्रकार व कर निर्धारणाची माहिती देऊन हरकत आणि अपीलाची प्रभावी संधी द्यावी, अशीही मागणी निलेश देव यांनी केली आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे