मृद व जलसंवर्धनासाठी राज्यव्यापी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा
अकोला, 18 ऑगस्ट (हिं.स.) : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मृद व जलसंवर्धनाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ ही
मृद व जलसंवर्धनासाठी राज्यव्यापी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा


अकोला, 18 ऑगस्ट (हिं.स.) : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मृद व जलसंवर्धनाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ ही राज्यव्यापी रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

युवा वर्गाच्या कल्पकतेचा आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंवर्धनाचा संदेश पोहोचविण्याचा या स्पर्धेचा उद्देश आहे. जलसंधारण दिनानिमित्त राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’, जलसंधारणाची शपथ तसेच विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याच सप्ताहात जिल्हास्तरावर मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धाही घेण्यात येणार आहे.

अशी असेल स्पर्धेची पद्धत

स्पर्धेसाठी पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. रीलच्या सुरुवातीला तिचा उद्देश, स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.

स्पर्धकाने तयार केलेली रील स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. तसेच मृद व जलसंवर्धन विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक आहे. यासाठी #SaveSoilSaveWater हा अधिकृत हॅशटॅग वापरणे अनिवार्य राहणार आहे.

या विषयांवर करता येणार रील

स्पर्धेसाठी माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना तसेच ‘आजचे संवर्धन, उद्याचे सुरक्षित भविष्य’ या विषयांवर रील तयार करता येणार आहे.

१०० गुणांवर होणार मूल्यांकन

रील्सचे मूल्यांकन एकूण १०० गुणांवर करण्यात येणार असून, त्यात विषय व संदेशासाठी ३० गुण, कल्पकतेसाठी २५ गुण, प्रभावी सामाजिक संदेशासाठी २० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्तेसाठी १५ गुण आणि Instagram Engagement साठी १० गुण निर्धारित करण्यात आले आहेत.

केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सच्या संख्येवर विजेता निश्चित केला जाणार नसून, तज्ज्ञ परीक्षण आणि सोशल मीडिया एंगेजमेंट या दोन्हींचा समतोल राखून गुणांकनानुसार विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यातून २५० रील्सचे उद्दिष्ट

राज्यभरासाठी एकच अधिकृत #SaveSoilSaveWater हॅशटॅग वापरण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रील्स आणि राज्यभरातून १० हजार रील्स तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद व जलसंवर्धनाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये व गौरवचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये व गौरवचिन्ह आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. पात्र सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून, विजेत्यांचा विशेष ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून गौरव करण्यात येणार आहे.

‘एक रील... मातीसाठी!

एक रील... पाण्यासाठी! एक रील... सुरक्षित भविष्यासाठी!’ हा या जनजागृती मोहिमेचा मुख्य संदेश आहे. या स्पर्धेत अधिकाधिक युवक-युवती तसेच नागरिकांनी सहभागी होऊन मृद व जलसंवर्धनाच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande