
पुणे, 18 ऑगस्ट (हिं.स.)।भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बारामतीत भव्य डोम उभारण्यात आला आहे. या वास्तूला ‘प्रेरणास्थळ’ असे नाव देण्यात आले आहे. बारामतीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवात या प्रेरणास्थळाची महत्त्वपूर्ण भर पडणार असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
प्रेरणास्थळाच्या उद्घाटनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती पवार यांनी दिली. १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान पंतप्रधानांच्या उपलब्ध वेळेनुसार उद्घाटनाची तारीख निश्चित केली जाणार आहे.
दरम्यान, १६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी बारामती दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्याने प्रेरणास्थळाच्या उद्घाटनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला शांतता, समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हे स्थळ बारामतीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु