
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.) : शहरातील सातारा आणि हरसूल परिसरातील दोन आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. अन्नपदार्थांच्या गोदामात सिगारेटची विक्री, मुदतबाह्य तुपाचा साठा, शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची एकाच रॅकवर साठवणूक तसेच आवश्यक तापमानाऐवजी सामान्य तापमानावर अन्नपदार्थ ठेवण्यात आल्याचे आढळले.
तपासणीदरम्यान गोदामातील स्वच्छतेची स्थितीही अत्यंत खराब असल्याचे समोर आले. शौचालयांच्या समोरच कांदा, बटाटा आणि पीठाचे रॅक ठेवण्यात आले होते. हात धुण्याच्या ठिकाणी तंबाखूच्या पिचकाऱ्यांचे डाग, तुटलेल्या फरशा, कचरा तसेच उंदरांचा धोका आढळून आला. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक वैद्यकीय तपासणीची प्रमाणपत्रे नव्हती. तसेच ॲप्रन, ग्लोव्हज आणि हेड कॅपचा वापर न करता अन्न हाताळले जात असल्याचेही निदर्शनास आले.
शीतगृहांच्या तापमानाच्या नोंदी, पिण्याच्या पाण्याचा तपासणी अहवाल, खरेदीची बिले आणि पुरवठा साखळीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे तपासणीत आढळले. काही अन्नपदार्थांच्या खरेदीच्या बिलांवर इतर आस्थापनांची नावे आढळून आल्याने संबंधित पदार्थांची पुरवठा साखळी आणि ट्रेसिबिलिटी स्पष्ट झाली नाही.
या सर्व गंभीर त्रुटींमुळे अन्नाच्या गुणवत्तेबरोबरच सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. कारवाईनंतर सहायक आयुक्त तथा परवाना प्राधिकारी द. वि. पाटील यांनी संबंधित आस्थापनांचा ‘बी’ अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला.
निलंबनाच्या कालावधीत संबंधित आवारातून अन्नपदार्थांची खरेदी, विक्री, साठवणूक तसेच ऑनलाइन डिलिव्हरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis