
स्थानिकांना रोजगाराच्या संधी; शाश्वत पर्यटनाला चालना
नाशिक, 18 ऑगस्ट, (हिं.स.)। राज्यातील पहिले रामसर क्षेत्र आणि ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या शाश्वत विकास व संवर्धनासाठी जिल्हा प्रशासन नाशिक आणि महाराष्ट्र वन विभागाच्या वन्यजीव विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘इको-टुरिझम आणि संवर्धन विकास आराखडा’ तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
अभयारण्याचा पर्यावरणीय समतोल कायम राखत जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा विकसित करणे, वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे तसेच स्थानिक समुदायाचा पर्यटन विकासात सक्रिय सहभाग वाढविणे, हा या आराखड्याचा प्रमुख उद्देश आहे.
*पर्यावरण संवर्धन आणि जलसुधारणेला प्राधान्य*
आराखड्यात अभयारण्यातील जलपर्णी व इतर आक्रमक वनस्पतींचे निर्मूलन, पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी व बेटे तयार करणे तसेच जलगुणवत्ता नियंत्रण यंत्रणा उभारण्याचा समावेश आहे. या उपाययोजनांमुळे जलपरिसंस्थेचे संवर्धन आणि पक्ष्यांसाठी अनुकूल अधिवास निर्मितीस मदत होणार आहे.
*आधुनिक पर्यटन सुविधांची निर्मिती*
पर्यटकांना अभयारण्याची जैवविविधता अधिक प्रभावीपणे अनुभवता यावी यासाठी निसर्ग परिचय केंद्र, आधुनिक निवास व्यवस्था, कॉन्फरन्स रूम, वॉच गॅलरी, फ्लोटिंग ट्रेल आणि पक्षी निरीक्षण केंद्र विकसित करण्याचे नियोजन आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अभयारण्यात ई-वाहने व चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्याचेही प्रस्तावित आहे. पॅडल व कायाक बोटिंगसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
*स्थानिक समुदायाला रोजगाराच्या संधी*
अभयारण्यालगतच्या १२ गावांतील स्थानिक युवकांना प्रमाणित निसर्ग व पक्षी मार्गदर्शक, होम-स्टे आणि इको-कॅफे संचालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पर्यटनातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नातील ३० टक्के निधी स्थानिक विकासासाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढण्यासोबतच पर्यटनातून ग्रामस्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
*आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षा*
अभयारण्यातील वन्यजीव आणि पर्यावरणीय सुरक्षेसाठी ड्रोन, स्मार्ट ॲप आणि थर्मल कॅमेऱ्यांचा वापर करून प्रभावी गस्त व देखरेख यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वन्यजीव संरक्षण, अवैध हालचालींवर नियंत्रण आणि अभयारण्याच्या संवेदनशील भागांवर देखरेख ठेवणे अधिक सुलभ होणार आहे.
*संशोधन आणि जनजागृतीला चालना*
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) यांच्या सहकार्याने पक्षी रिंगिंग स्टेशन तसेच मध्य आशियाई उड्डाण मार्गावरील (Central Asian Flyway) पक्ष्यांच्या अभ्यासासाठी केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय ५० हून अधिक शाळांमध्ये इको-क्लब स्थापन करून विद्यार्थी व नागरिकांमध्ये जैवविविधता, पक्षी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
*जैवविविधतेने समृद्ध अभयारण्य*
गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर सुमारे १,१९८ हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात ३०० हून अधिक पक्षी प्रजाती आढळतात. यामध्ये १३० हून अधिक स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. तसेच ५३६ वनस्पती प्रजाती आणि २४ हून अधिक गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजातींची नोंद आहे. गोदावरी नदीकाठावरील ‘स्ट्रिक-थ्रोटेड स्वॅलो’ (किफ स्वॅलो) पक्ष्यांची चिखलाची घरटी हे या परिसराचे वैशिष्ट्य आहे.
*बैठकीस मान्यवरांची उपस्थिती*
या बैठकीस खासदार भास्कर भगरे, प्रादेशिक विभागाचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश शेपट, वन्यजीव विभागाचे कृष्णा भवर, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, पालकमंत्री श्री. महाजन यांचे ओएसडी संदीप जाधव, नांदूर मध्यमेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, बीएनएचएसचे डॉ. जयंत वडतकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे) यांच्यासह डॉ. विजय बर्वे, मनीष गोडबोले, डॉ. ॲग्नेस खरात, अभिनव नायर, पक्षीअभ्यासक सतीश गोगटे, डॉ. अनिल माळी, मनोज जोशी, अनंत सरोज, प्रा. अदिती शेरे आदी उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धन, वैज्ञानिक संशोधन, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या आर्थिक उन्नतीचा समन्वय साधणारा हा विकास आराखडा नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI