परभणीतील मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक प्रयोगशाळेला एनएबीएल मानांकन
परभणी, 18 ऑगस्ट (हिं.स.) : परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटलच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील अत्याधुनिक मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक प्रयोगशाळेला (Molecular Diagnostic Laboratory) एनएबीएल, (National Accreditation Board for Testing and Calibration La
परभणीत प्रथमच आर.पी. हॉस्पिटलच्या सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन


परभणी, 18 ऑगस्ट (हिं.स.) : परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटलच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील अत्याधुनिक मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक प्रयोगशाळेला (Molecular Diagnostic Laboratory) एनएबीएल, (National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories) मानांकन प्राप्त झाले आहे. परभणीच्या वैद्यकीय क्षेत्रातील ही महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात असून, या मानांकनामुळे परभणीसह संपूर्ण मराठवाड्यातील रुग्णांना राष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळा सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.

या अत्याधुनिक प्रयोगशाळेत जीवाणूंची कल्चर व अँटिबायोटिक सेन्सिटिव्हिटी चाचणी, क्षयरोगाचे (TB) निदान, औषध प्रतिकारक क्षयरोगाची (TB Drug Resistance) तपासणी तसेच कर्करोगाशी संबंधित विविध मॉलिक्युलर चाचण्या केल्या जात आहेत. याशिवाय, यापूर्वी निदान करणे आव्हानात्मक असलेल्या विविध गुंतागुंतीच्या संसर्गजन्य तसेच इतर आजारांचे अचूक निदान आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करणे शक्य झाले आहे.

अत्याधुनिक निदान सुविधा परभणीतच उपलब्ध झाल्याने अनेक रुग्णांना तपासणीसाठी पुणे, मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे. त्यामुळे रुग्णांचा वेळ व खर्च वाचण्यासोबतच गंभीर आजारांचे निदान अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.

ही प्रयोगशाळा अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून, प्रशिक्षित व अनुभवी तज्ज्ञ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. एनएबीएल मानांकनामुळे प्रयोगशाळेतील तपासण्या निर्धारित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणवत्ता निकषांनुसार करण्यावर भर राहणार असून, रुग्णांना अधिक अचूक आणि विश्वासार्ह तपासणी अहवाल मिळण्यास मदत होणार आहे.

या प्रयोगशाळेच्या उभारणीमागे आर.पी. हॉस्पिटलचे प्रमुख तथा आमदार डॉ. राहुल पाटील यांची दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांचे प्रभावी नेतृत्व व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या प्रयत्नांमुळे परभणी जिल्ह्यात आधुनिक आणि उच्च दर्जाच्या निदान सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत झाली.

या उल्लेखनीय यशाबद्दल आर.पी. हॉस्पिटलचे प्रमुख आमदार डॉ. राहुल पाटील आणि अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी डॉ. किरण सगर, डॉ. प्रतिभा माने, डॉ. संतोष हरकळ आणि गुणवंत अहिरे यांचे अभिनंदन केले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande