
सोलापूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। तालुक्यातील जेऊर येथील ऐतिहासिक काशिलिंग (महादेव) मंदिराच्या आवारातील पिंपळाच्या ओट्यावर तेराव्या शतकातील भग्न शिलालेख आढळून आला आहे. या शिलालेखाचा उर्वरित भाग असलेला शिलाखंड मात्र परिसरात अद्याप आढळलेला नाही. उपलब्ध शिलालेखाचे वाचन करण्यात आले असून, त्यातून जेऊर परिसराचे प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे.
शिलालेखाच्या वरच्या भागावर शिवलिंग, गाय, सूर्य-चंद्र आणि तलवार यांची स्पष्ट कोरीवकामे आहेत. त्याखाली कन्नड भाषेतील तीन ओळींचा मजकूर कोरलेला आहे. शिलालेखाचा खालचा मोठा भाग भग्न होऊन गहाळ झाल्याने सध्या उपलब्ध असलेल्या तीन ओळींचेच वाचन शक्य झाले आहे.
शिलालेखाच्या सुरुवातीला बाणभट्टकृत ‘हर्षचरित’ या संस्कृत ग्रंथातील भगवान शिवाची स्तुती करणारा श्लोक कोरलेला आहे.
‘नमस्तुङ्गशिरश्चुम्बी चन्द्रचामरचारवे ।
त्रैलोक्यनगरारम्भमूलस्तम्भाय शम्भवे ॥’
या श्लोकातून भगवान शंभूची स्तुती करण्यात आली आहे. ज्याच्या उंच मस्तकाला चंद्र जणू चौरी ढाळत आहे आणि जो तिन्ही लोकांच्या नगररचनेचा मूळ आधारस्तंभ आहे, अशा भगवान शंभूला नमस्कार, असा या श्लोकाचा आशय आहे.
श्लोकानंतर ‘स्वस्ति श्रीमथु या’ असा उल्लेख आढळतो. त्यातील ‘या’ या अक्षराच्या आधारे हा शिलालेख यादवकालीन असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा कालखंड साधारण तेरावे शतक असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड