
बीड, 18 ऑगस्ट (हिं.स.) : बीड शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली. यावेळी बीड शहरातील विकासकामांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
रोहित पवार यांच्या समवेत झालेल्या या भेटीत बीड शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच अन्य नागरी सुविधांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
प्रलंबित प्रश्न केवळ चर्चेपुरते न राहता त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात होणे गरजेचे आहे, अशी भूमिका आमदार क्षीरसागर यांनी मांडली. बीड शहराच्या विकासासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis