मंगळवेढा–विजयपूर महामार्ग चौपदरीकरण; मरवडेकरांची गावालगतून मार्गाची मागणी
सोलापूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। मंगळवेढा–विजयपूर राष्ट्रीय महामार्गाचे प्रस्तावित चौपदरीकरण मरवडे गावालगतूनच करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांग
मंगळवेढा–विजयपूर महामार्ग चौपदरीकरण; मरवडेकरांची गावालगतून मार्गाची मागणी


सोलापूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। मंगळवेढा–विजयपूर राष्ट्रीय महामार्गाचे प्रस्तावित चौपदरीकरण मरवडे गावालगतूनच करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात ग्रामस्थांचा सहभाग वाढत गेला.

टेंभुर्णी–मंगळवेढा–विजयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ ए वर वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चौपदरीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. या चौपदरीकरणासाठी गुगल मॅपच्या आधारे तयार करण्यात आलेला बायपास रस्त्याचा नकाशा सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. या नकाशानुसार बायपास मरवडे गावापासून दूरून प्रस्तावित असल्याचे दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

बायपास रस्ता गावापासून लांबून गेल्यास मरवडे येथील बाजारपेठेवर मोठा परिणाम होऊन स्थानिक व्यापाराचे नुकसान होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे चौपदरीकरणाचा मार्ग मरवडे गावालगतूनच नेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

मंगळवेढा तालुक्याच्या आग्नेय भागातील मरवडे हे प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे. डोणज, बालाजीनगर, तळसंगी, भालेवाडी, येड्राव, खवे, कागष्ट, कात्राळ, कर्जाळ आणि हुलजंती या परिसरातील नागरिकांचे आर्थिक व व्यावसायिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर मरवडे बाजारपेठेवर अवलंबून आहेत.

त्यामुळे प्रस्तावित चौपदरीकरणात गावाच्या बाजारपेठेचा आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचा विचार करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसंदर्भात खासदार आणि आमदारांनीही संबंधित यंत्रणांकडे पत्रव्यवहार केला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande